Military life has its own unique set of challenges . With deployment and moving everyday life circumstances become extraordinary situations . Shilpa my dear friend who is a military spouse handles all these day to day circumstances with patience and grace . The couple (Shilpa and Vikram ) together have some serious tenacity . Shilpa visited the Kargil War memorial in Dras at foothills of Tololing hill . She has beautifully worded her experience from that trip . Kargil Vijay Diwas is celebrated every year on 26 th july . It acknowledges and honors the heroes of Kargil war that got India victory in 1999. The write up is a perfect one to share with you all on occasion of Vijay Diwas today .
आज कारगिल विजय दिवस, 26 जुलै 2018. ठिक 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 साली याच दिवशी आपल्या वीर सैनिकांच्या धाडसामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला. आजपर्यंत कारगिल युद्धाच्या बर्याच कहाण्या ऐकल्या आहेत. गुगल वर फक्त कारगिल म्हणून शोधलं तर कित्येक लेख समोर येतात. प्रत्येक लेख वाचताना अभिमान वाटतो. पण मी आज माझ्या कारगिल भेटीचा अनुभव सांगणार आहे.
आत्ता पर्यंत कारगिल विजय दिवसाच्या दिवशी आठवणारे शहिद सैनिकांना मी फक्त पिक्चर मध्येच पाहिले आणि अनुभवले होते. पण यंदा मे महिन्यात त्यांच्या बद्दल पूर्ण पणे जाणून घेण्याचा आणि ह्यात नसून देखील अजूनही तिथे ते असण्याचा आभास घेतला. मी स्वतः एक सैनिक पत्नी असून मला ही कारगिल युद्धा बद्दल तितकेचं माहित होते जितके एखाद्या सामान्य माणसाला. कदाचित थोडं जास्त. कारगिल म्हटले की काही ठराविक नावं लगेच मनात येतात, लेफ्टनंट विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, द्रास, तोलोलिंग शिखर, टायगर हिल आणि AK 47. खरं सांगायचं तर LOC कारगिल सिनेमा पाहिल्यानंतर लेफ्टनंट विक्रम बत्रा म्हटले की अभिषेक बच्चन आणि लेफ्टनंट मनोज पांडे म्हटले की अजय देवगन आठवायचे. पण आता तसे नाही. कारगिल च्या पावन भूमीवर जाऊन आल्यापासून लेफ्टनंट विक्रम बत्रा आणि लेफ्टनंट मनोज पांडे यांचा चेहरा अगदी डोळ्यासमोरून जात नाही. शिवाय कॅप्टन विजय थापर, कॅप्टन अनुज नायर, मेजर पद्मापानी आचार्या, रायफ़लमन संजय कुमार, योगेंद्र सिंग यादव आणि बरीच अशी शहिदांची नावे देखील मनात बसली.
आज हा माझा अनुभव लिहिण्याचा एकचं उद्देश आहे, सर्व भारतीय, ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तरी लेह- कारगिल ला भेट द्यावी. आम्ही जेव्हा कारगिल मध्ये पोहचलो तेव्हा वाटेत म्हणजेच श्रीनगर ते कारगिल या वाटेवर बरेच उंच शिखर लागले. लांबुनच टायगर हिल व टोलोलिंग हे पर्वत पाहिले. त्यावेळी कारगिल मध्ये दिवसा 8 ते 10 डिग्री आणि रात्री 1 ते 2 डिग्री तापमान होते. आमचा लहान मोठे मिळून 30 जणांचा ग्रुप होता. 3 वर्षांपासून ते 68 वयापर्यंतचे मेंबर होते. वातावरण लक्षात घेता प्रत्येकाने तीन लेयर मध्ये कपडे घातले होते. आतमध्ये थर्मल्स, त्यावर नेहमीप्रमाणे जिन्स व शर्ट आणि त्याच्यावर परत जाडसर जॅकेट. शिवाय कानटोपी, हॅन्ड ग्लोव्स, पायमोजे- बूट आणि गाॅगल घातले होते. इतके असून देखील आम्ही सगळे गारठून गेलो होतो. आमचा ट्रिपचा तो दुसराचं दिवस होता. तिथल्या थंडीची आणि अंगाला शहारून जाणार्या सुसाट वार्याची आम्हाला अजून ओळख झाली नव्हती. पण उत्साह देखील तितकाच होता. जेव्हा कारगिल वाॅर मेमोरियल पहायला उतरलो तेव्हा सगळे तरतरीत झाले, जनू काही युद्ध बघायला मिळणार होते. तिथले द्रुश्य भारावून टाकणारे. अमर ज्योत पाहून प्रत्येकाचे हात आपोआप जोडले जात होते. त्या ठिकाणी उभे राहून एकचं विचार मनात येत होता,19 वर्षांपूर्वी देखील अशीच थंडी व वारं असणार, या उभ्या ठिकाणी हाताची घडी जरी काढली तर थंडी सहन नाही होणार अशा भावना मनात होत्या तिथे सैनिक बंदूक घेऊन, पाठीवर ओझं घेऊन कसे लढले असावेत. बरं बंदूक फक्त सांभाळायची नव्हती तर अचुक पणे चालवायची होती. अशा परिस्थितीत ते फक्त लढलेच नाही तर जिंकून देखील आले. अशा विरांना शतशः प्रणाम. वाॅर मेमोरियलच्या मागे टोलोलिंग हे पर्वत आहे. हा पहिला शिखर आपण परत मिळवल्यानंतर खर्या अर्थाने कारगिल युद्ध जिंकायला सुरुवात झाली. त्या पर्वतांकडे पाहत असताना असे वाटते ते सगळे सैनिक अजूनही तिथे उभे आहेत, सतर्क आहेत, मजाल असेल तरच शत्रूने पुन्हा आत शिरण्याची चूक करावी. कारगिल युद्धाची एक छोटी फिल्म तिथे पहायला मिळाली. मन भरून आले पण तितकेच रोमांचित पण झालो. खुप अभिमानाने तिथून बाहेर पडलो.
त्या रात्री आमचा मुक्काम कारगिल मध्येच होता. 9 ते 10 तासांच्या प्रवासा नंतर थकल्याने आम्हाला सगळ्यांना हाॅटेल वर जाऊन आरामची आणि उबेची आस लागली होती. अंधार पडला होता. हाॅटेल च्या दारात पोहचल्यावर सगळ्यांची एकचं तारांबळ उडाली. आमच्या टुर मॅनेजर ने आम्हाला सांगितले आज आपला मुक्काम तंबू मध्ये आहे. त्या वेळी तापमान कदाचित 4 ते 5 डिग्री होते. थंडीने गारठलेलो आम्ही, सगळ्यांचा नाराजीचा सूर. कसे राहणार तंबू मध्ये ईतक्या थंडीत, इतकी लहान मुलं आणि ज्येष्ठ लोक पण आहेत, त्यांना कसे सहन होणार! खरं सांगायचेतर लहान सगळी मजेत होती, आम्हीच आपलं त्यांच्या नावाखाली तंबू ऐवजी हाॅटेल मध्ये सोय होते का बघत होतो. आमच्या टुर मॅनेजर ने आम्हाला मनवलं व विनवणी केली कि आज तुम्ही जर इथे राहीला व अनुभव घेतला तर आयुष्यभर तुम्ही कधी थंडीला घाबरणार नाही. हा अनुभव म्हणजे लेह- लडाख आहे. तुम्हाला खर्या अर्थाने लेह च्या आठवणी घेऊन जायच्या असतील तर हा अनुभव घ्यावाचं लागेल. सर्वजन आपआपल्या तंबू मध्ये गेले. तंबू आतून छान होता. बेडवर जाडसर गादी आणि दोन जाड गोधड्या. पण जेव्हा बेडवर बसले तेव्हा असे वाटले गादी ओली आहे. खरतर ती ओली नसून थंड होती अगदी बर्फासारखी. पण जसे होते त्यातच आम्हाला रात्र काढायची होती. थोडावेळ शेकोटी समोर नाच गाणे करून आम्ही शहारणार्या थंडी पासून मन विचलित करायचा प्रयत्न करत होतो. त्यात थोडेफार यशस्वी झालो पण काही वेळा करताच. जेवन झाल्यावर सगळ्यांना तंबूत जायची भिती वाटायला लागली. कसेतरी सगळे मंद दिवा असलेल्या त्या तंबूत झोपायला गेले. माझ्या तंबू मध्ये माझी आई व माझा 6 वर्षांचा मुलगा होता. त्या दोघांना लगेच झोप लागली पण मला नाही. अचानक लाइट गेली. वाटले येईल लगेच. अगदीच काळोख झाला म्हणून टूर मॅनेजरला फोन करून विचारले तर तो म्हणाला लाइट आता उद्या सकाळी येणार. अजून भितीत भर. म्हणे त्या गावात लाइटच नाही. सकाळी थोडावेळ आणि संध्याकाळी थोडावेळ असे ते जनरेटर चालु असतो. मी भारावून गेले. 21 व्या शतकात आपण ईतके ऐशआरामात जगत असताना काही लोक अशा परिस्थितीत पण राहतात!! झोप तर मला काही केल्या येत नव्हती. कूस बदलली तरी थंडीने कुडकुडायला होत होते. राहून राहून एकचं विचार मनात येत होता... 3 महिन्यांपेक्षा जास्त दिवस अशा परिस्थितीत सैनिक कसे लढले असावेत.? मी तरीसुद्धा मऊ गादीवर गोधड्या घेऊन झोपले होते, त्यांना तेही नव्हते. त्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिले, मी एक दिवस जरी त्यांच्या सारखा घालवला तर थोडी परतफेड केली म्हणायची. हा अनुभव आमच्यासाठी रोमांचक आणि अभिमानाचा होता. सुदैवाने आम्हाला कोणालाही त्रास नाही झाला. पुढच्या दिवशी सगळे फ्रेश व पुढे असलेल्या दिनक्रमाची चर्चा करू लागले. समोरचे ते उंच व विशाल शिखर बघून एकचं वाटत होते... आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
- शिल्पा पाटील
No comments:
Post a Comment